अर्जुन कर्पे
कवठेमहांकाळ : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवक राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना बांधणी करण्यात आली आहे. यामध्ये युवकांना संधी मिळल्याने नव्या दमाचे कारभारी लयभारी अशी चर्चा आता तालुक्यातील युवकांत सुरू आहे. या निवडीवर सगरे गटाचे वर्चस्व राहिले आहे.
तालुक्यात काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षात जनाधार असलेले युवक कार्यकर्ते शोधून त्यांना संधी देण्याचे काम राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून सुरू आहे.
तालुक्यातील युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षपदी विठुरायचीवाडी येथील मोहन खोत यांची नुकतीच निवड झाली. मोहन खोत हे विठुरायचीवाडी येथील माजी सरपंच तसेच तालुक्यात युवकांचे संघटन असणारे कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन खोत यांना आमदार सुमनताई पाटील यांनी या पदाची संधी दिली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षपदी (ग्रामीण) अलकुड एस येथील सौरभ ओलेकर यांना अनिता सगरे यांच्या आग्रहाखातर पालकमंत्री जयंत पाटील यांनी संधी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एका युवकाला थेट जिल्हापातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. कोणताही वारसा नसताना मोठी राजकीय संधी सौरभ ओलेकर यांना मिळाल्याने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये पक्षीय ओढ वाढत आहे. सौरभ ओलेकर यांचा तालुक्यातील ग्रामीण भागात तरुणांमध्ये संपर्क आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे.
ढालगाव भागातील सोमनाथ टोणे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. ही संधी राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांच्यामुळे मिळाली आहे. टोणे यांचा ढालगाव भागात तरुणांमध्ये संपर्क आहे. शिवाय त्यांनी त्या भागात युवकांचे संघटन उभारले आहे. याचा मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे.
चाैकट
सगरे गटास बळ
युवक राष्ट्रवादी व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत सगरे गटाने आपले वर्चस्व राखले आहे. त्यामुळे सगरे गटाला ही राजकीय बळ मिळणार आहे. हे निश्चित आहे.
मोहन खोत, सौरभ ओलेकर, सोमनाथ टोणे हे युवक निष्ठेने काम करणारे असल्याने तालुक्यात राष्ट्रवादीला युवकांची संघटना करण्यास वाव मिळणार आहे.