कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्याला आज, गुरुवारी वादळी वारा आणि गारपिटीने झोडपून काढले. तासभर सुसाट वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. कुची येथे वीज पडून नारळाचे झाड जळाले.आज, दिवसभर कवठेमहांकाळ तालुक्यात वातावरणात प्रचंड उकाडा होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास तालुकाभर पावसाला सुरुवात झाली. ढालगाव परिसर, घाटमाथा, आगळगाव, करोली टी, कोकळे परिसर सर्वच भागात वादळी वारे सुटले. काही क्षणातच मुसळधार पाऊस झाला. एक तास गारपीट, वादळी वाऱ्याने तालुक्याला जनजीवन विस्कळीत केले.तालुक्यातील काही भागातील घरांची पडझड झाली आहे. काही घरांचे पत्रे उडाले आहेत. भाजीपाला, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. कुची येथे रस्त्याच्या कडेला गावच्या स्वागत कमानीजवळ नारळाच्या झाडावर वीज पडली. त्यामुळे नारळाच्या झाडाने भरपावसात पेट घेतला.
कवठेमहांकाळ तालुक्याला वादळी पावसाने झोडपले, कुचीत वीज पडून नारळाचे झाड पेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 5:25 PM