लोकमत न्यूज नेटवर्क
कवठेएकंद : राजकीयदृष्ट्या जागृत आणि संवेदनशील असणाऱ्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथे आगामी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होणे पुढे ढकलले असले तरीही, सरपंच पदाच्या निमित्ताने अनेकांनी तयारी दर्शवली आहे.
गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सरशी करत भाजप आणि शेकापला शह दिला होता. १७ जागांपैकी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने १२ जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते, तर भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले. शेतकरी कामगार पक्ष एका जागेवर विजयी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या ग्रामपंचायतीची पाच वर्षे मात्र गावाच्या विकासाच्यादृष्टीने कमकुवतपणे गेली आहेत. करवसुली व कारभाराच्या अनेक मुद्यांवर शेवटचा कालखंड चर्चेचा विषय बनला होता. समाधानकारक सुविधा पुरविण्यात गतवेळच्या ग्रामपंचायत सदस्यांना शक्य झाले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा घेऊन शेतकरी कामगार पक्ष, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, बहुजन वंचित आघाडी अशा सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून इच्छुक कार्यकर्त्यांची धांदल सुरू झाली आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक रंगणार आहे.
चाैकट
बिनविरोधची शक्यता
गावातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या गुप्त हालचालींमुळे बिनविरोध होणार की काय, अशी शक्यताही निर्माण झाली आहे. या निवडणुकीचे रंग येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.