सांगली : वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागज फाट्यावर बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.प्रमोद मारुती रोडे (वय ३२) व सुनील मल्हारी घोडके (२९) अशी अटक केलेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ माजली आहे.तक्रारदार कवठेमहांकाळ परिसरातील आहेत. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. पहाटेच्यावेळी ते ट्रकमधून वाळूची वाहतूक करतात. प्रमोद रोडे व सुनील घोडके यांनी तक्रारदारास वाहतूक करताना अडविले. कारवाईची धमकी देऊन २० हजार रुपये लाचेची मागणी केली.
चर्चेअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकारानंतर तक्रारदाराने सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. या विभागातील विशेष पथकाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये रोडे व घोडके यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.रोडे व घोडके यांनी तक्रारदारास बुधवारी रात्री नागज फाट्यावरील हॉटेल शिवकृपाजवळ लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा लावला. रोडे व घोडके लाचेची रक्कम स्विकारल्याचा सिग्नल मिळताच पथकाने त्यांना पकडले. अनपेक्षित झालेल्या या कारवाईने रोकडे व घोडके यांना ऐन थंडीत घाम फुटला.पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, हवालदार भास्कर भोरे, जितेंद्र काळे, संजय कलगुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार, स्वाती माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.