शिरढोण : खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे हस्तीदंतांची तस्करी करणाऱ्या चौघांची टोळी कवठेमहांकाळ पोलिसांच्या हाती लागली. त्यांच्याकडून वीस लाख रुपये किमतीचे दोन हस्तीदंत जप्त करण्यात आले. रविवार, दि. ९ रोजी रात्री ११ वाजता दंडोबा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.राहुल भीमराव रायकर (वय २६, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), बालाजी हरिचंद्र बनसोडे (३०, रा. विजयनगर, कोल्हापूर), कासीम शमशुद्दीन काझी (२०, रा. खाजा वस्ती, मिरज), हणमंत लक्ष्मण वाघमोडे (३९, रा. खोत वस्ती, पांडेगाव, ता. अथणी) या चौघा तस्करांना अटक करण्यात आली आहे.खरशिंग ते दंडोबा रस्त्यावर असलेल्या गिरनार तपोवन मठाजवळ झुडपांमध्ये काहीजण हस्तीदंताच्या तस्करीसाठी आल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रसिंग साबळे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकाने खरशिंग, दंडोबा परिसरात धाव घेतली. यावेळी गिरनार तपोवन शेजारी असलेल्या झुडपामध्ये काहीजण अंधारात संशयास्पदरित्या बसल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.मात्र पथकाने त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यांच्याकडे ३८ व ३९ सेंटिमीटर लांबीचे दोन हस्तीदंत मिळून आले. तपकिरी पांढऱ्या रंगाच्या, पुढील बाजूस टोकदार व भरीव असलेल्या या दोन्ही हस्तीदंतांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. याशिवाय चौघांनी आणलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.ही कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक निरीक्षक सागर गोडे, सहायक उपनिरीक्षक विजय घोलप, पोलीस नाईक अमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे, केरुबा चव्हाण, सिद्धेश्वर कुंभार यांनी केली.चौघांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक अमिरशा फकीर करीत आहेत.
सांगली: खरशिंग येथे हस्तीदंत तस्करांची टोळी जेरबंद, वीस लाखांचे हस्तीदंत जप्त; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:34 PM