मिरज: साहित्य, संगीत, आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तीमत्व प्रा. कल्याणी किशोर यांचे शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास झोपेतच निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या. मुळच्या मिरजेच्या असलेल्या प्रा. कल्याणी किशोर या नंतर पुण्यात राहत होत्या. गोंदवलेकर महाराज यांच्या घराण्यात जन्मलेल्या कल्याणी किशोर या पूर्वाश्रमीच्या कल्याणी इनामदार होत. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यानी उस्ताद बडे गुलाम अली यांची मुलाखत त्यानी घेतली होती.
पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी खाॅ साहेब अमिर खाॅ, पंडित कुमार गंधर्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यानंतर त्यांची संगीत समीक्षक म्हणून ओळख निर्माण झाली. कादंबरी, कविता, समीक्षण, चरित्रकार अशी त्यांची विशेष ओळख होती. श्री दत्ता बाळ, संत आनंदमयी माॅ, यांचे चरित्र लेखन कल्याणी किशोर यानी केले होते. गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे लिहिलेले चरित्र संगीत क्षेत्रात खूपच गाजले. तसेच जगप्रसिद्ध तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ति यांच्या चरित्राचा आणि त्यांच्या इतर ग्रथांचा मराठीत अनुवाद केला आहे. त्यानी उत्तम खेळाडू, तसेच उत्कृष्ठ चित्रकार म्हणूनही लौकिक मिळवला होता.
कृष्णमूर्ति फाऊंडेशन मध्ये काम करीत असताना त्यांचा किशोर खैरनार यांच्याशी परिचय झाला. नंतर हे दोघे विवाहबध्द झाले. त्यांच्या पश्चात पती किशोर खैरनार, बंधू डाॅ. दिलीप इनामदार, आणि भगिनी प्रा. उत्तरा जोशी असा परिवार आहे. अस्थिविसर्जन शनिवारी दि. ६ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहेत.