सांगली : टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ, बद्रीनाथ येथे घेऊन जाण्याचे आमिष दाखवत पाच लाख २९ हजार ४०० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी धनश्री रामचंद्र कुंभार (रा. भोसे ता. मिरज) यांनी परेश सुभाष गुजर (रा. गंजपेठ, पुणे) याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. संशयित गुजर यांची इंडिया हॉलीडेज चारधाम टूर या नावाने पुणे येथे कार्यालय आहे. या टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ व बद्रीनाथ येथे जाण्यासाठी फिर्यादी कुंभार यांच्यासह १८ महिलांनी प्रत्येकी ३२ हजार रुपये भरले होते. ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम गुजर यांच्या मोबाइलवर पाठविण्यात आली होती. ३२ हजार रुपयांसह २६ हजार ५०० रुपयेही त्याने भरून घेतले होते. असे पाच लाख २९ हजार ४०० रुपये संशयित गुजर याला देऊनही त्याने या ट्रीपचे आयोजन केले नव्हते. यामुळे कुंभार यांनी त्याच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. वारंवार विचारणा करूनही त्याच्याकडून प्रतिसाद येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
केदारनाथ, बद्रीनाथ सहलीच्या आमिषाने साडेपाच लाखांचा गंडा, संशयित पुण्यातील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 1:54 PM