इस्लामपूर : धर्मव्यवस्थेचा उन्माद काही मर्यादेपर्यंतच चालतो. समाजाच्या अज्ञानावर या व्यवस्थेचे प्राबल्य आधारलेले असते. मात्र शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोनासमोर त्याला नमावे लागते. त्यामुळे नव्या पिढीने धर्माच्या नादाला न लागता विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी केले.येथील केबीपी महाविद्यालयाचे खगोल अभ्यासक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी लिहिलेल्या ‘पत्रिका जुळवताना’ आणि ‘अंतराळ समजून घेताना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रा. डॉ. पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आर. डी. पाटील, सौ. सरोज पाटील, प्रा. शामराव पाटील, मुक्ता दाभोलकर, सौ. दीपिका शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. अंधश्रध्दा निर्मूलन समिती, नाग—नालंदा प्रकाशन, महात्मा फुले शिक्षण संस्था यांच्यावतीने आयोजित विवेक संवाद कार्यक्रमात हे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.प्रा. डॉ. पाटील म्हणाले की, लग्नासाठी पत्रिकेतील गुण जुळविण्याची किमया ज्योतिषाच्याच हातात असते. मात्र ज्यांचे ३६ गुण जुळले, त्यांच्या पुढील आयुष्यात ३६ चा आकडा बनल्याची कित्येक उदाहरणे आहेत. पत्रिका पाहणाऱ्या आणि हुंडा मागणाऱ्या मुलाशी लग्न न करण्याची भूमिका मुलींनी घ्यावी.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या की, इतर कुणाच्या चमत्कारावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या मुठीतील कर्तृत्वावर विश्वास ठेवल्यास आनंदी जीवन जगता येईल. पत्रिका जुळवताना आपण निवड स्वातंत्र्याचा अधिकार दुसऱ्याकडे गहाण टाकतो. त्यावेळी स्वत्व संपते, आत्मविश्वास ढळतो. लेखक डॉ. शिंदे म्हणाले की, खगोलशास्त्राचा अभ्यास करताना जनमानसावर फलज्योतिषाचा प्रचंड पगडा असल्याचे अनुभवायला मिळाले. त्यामुळे पुरोगामी संत-सुधारकांनी केलेल्या सुधारणा पुढे प्रवाही ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच केला. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, आपला देश मंगळ ग्रहावर यान पाठवितो. मात्र मंगळ असणाऱ्या मुला—मुलींचे विवाह ठरत नाहीत. हे सर्व पत्रिका बनविणाऱ्यांच्याच हातात असते. संजय बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. डॉ. प्रमोद गंगणमाले यांनी सूत्रसंचालन केले. योगेश कुदळे यांनी आभार मानले. यावेळी विश्वास सायनाकर, प्राचार्य डॉ. जे. के. पाटील, एल. जी. दाभोळे, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, शिवाजीराव माने, प्रा. वि. द. कदम, अॅड. बी. डी. पाटील, महेश मोरे, सर्जेराव यादव, त्र्यंबकेश्वर मिरजकर उपस्थित होते. (वार्ताहर)पिंपळाचं काय झालं?प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले की, अभिनेत्री ऐश्वर्या रायला कडक मंगळ होता. त्यामुळे तिचे पहिले लग्न पिंपळाच्या झाडाशी लावण्यात आले. त्यानंतर अभिषेक बच्चनशी ती विवाहबध्द झाली. आता या दोघांचा संसार सुरळीत सुरू आहे. मात्र त्या पिंपळाच्या झाडाचे काय झाले, हे कोणी पाहिले आहे का?
धर्माच्या नादाला न लागता विज्ञानाची कास धरा
By admin | Published: January 05, 2016 11:37 PM