शरद जाधव/लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनातून मुक्त होऊनही इतर आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना रुग्णालयातच थांबावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यातही सहव्याधी असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, कोरोनातून बरे झाल्यानंतर श्वासाच्या तक्रारी, धाप लागणेे, अशक्तपणा यासह इतर लक्षणांसाठी उपचार घ्यावे लागत आहेत. यातील अनेकांना महिना-महिना रुग्णालयातच थांबावे लागत आहे.
कोरोनाचे निदान आणि त्यातून बरे झाल्यानंतर दिव्यातून बाहेर पडल्याचा अनुभव प्रत्येकाचा असतो. मात्र, अगोदरच विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांमध्ये कोरोनानंतर पुन्हा आजार बळावत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वयाने तरुण असलेले रुग्ण महिनाभरात केवळ थकवा सोडला तर पूर्ण बरे हाेत असले तरी मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर त्रास होत आहे.
विशेष करुन काेरोना उपचारावेळी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी बरे झाल्यानंतरही खालावत आहे. शिवाय चव न लागणे, तोंडाला कोरड पडणे अशीही लक्षणे दिसून येत आहेत.
काही रुग्णांची स्थिती तर अशी आहे की, कोरोनावर उपचार घेऊन घरी गेल्यानंतर ‘नॉन कोविड’ उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे व त्यातही महिनाभर रुग्णालयातच काढावे लागल्याने प्रकृती अधिक चिंताजनक बनत आहे.
चौकट
कोरोनातून बरे, अन्य व्याधींचा त्रास
* कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना घरी गेल्यानंतर श्वसनाचा त्रास अधिक जाणवतो.
* ऑक्सिजनची पातळी कमी होणे यासह धाप लागल्यामुळे रुग्णांची अस्वस्थता वाढत आहे.
* पुन्हा त्रास वाढण्यापेक्षा काही स्वत:हून रुग्णालयात पुन्हा दाखल होत आहेत.
चौकट
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
कोरानातून बरे झालेल्या व नंतरही इतर त्रास झालेल्या रुग्णांमध्ये ज्येष्ठांचा समावेश सर्वाधिक आहेे. कोराेनानंतर म्युकरमायकोसिसने डोके वर काढल्याने पुन्हा त्रास झाल्यास ज्येष्ठ रुग्ण तातडीने उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत.
चौकट
बरे झाल्यानंतर अशी घ्या काळजी
* शरिरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर करा.
* ‘सिक्स मिनीट वॉक’मुळेही शरिरातील बदल लक्षात येतात शिवाय पुढील उपचारालाही मदत होते.
* पौष्टिक आहाराबरोबरच केवळ ‘बेड रेस्ट’ घेण्याऐवजी झेपेल असा व्यायाम केल्यासही इतर व्याधींवर मात करता येऊ शकते.
कोट
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच तितकेच रुग्ण बरेही होत आहेत. तरीही अगोदरच काही आजार अथवा औषधे चालू असलेल्या रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर त्रास होतो. अशा रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व पुढील उपचार घ्यावेत. जेणेकरुन त्रास टाळता येतो.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक