सांगली : बारव शोध मोहीमेत सांगलीतील किल्लीच्या आकाराच्या विहीरीवर संशोधकांनी प्रकाशझोत टाकला आहे. विजयनगरमध्ये कुंभार मळ्यात गणपती कुंभार यांच्या मालकीची ही पेशवेकालीन विहीर आहे. एखाद्या कुलुपाच्या किल्लीसारखा तिचा आकार आहे.नानाची विहीर म्हणून परिसरात ती ओळखली जाते. किल्लीच्या आकारातील भव्य, दिव्य आणि दगडी बांधकामाची मजबूत बारव सुमारे ३०० वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. शेतीसाठी गोड पाण्याचा पुरवठा करत आहे.
महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मोजक्या किल्लीच्या आकाराच्या विहिरी आहेत. असा आकार दुर्मिळ मानला जातो. सध्या विहीर दुर्लक्षित असली तरी जपणुकीसाठी प्रयत्न व्हायला हवेत असा बारवप्रेमींचा सूर आहे.सतराव्या शतकातील ही पेशवेकालीन विहीर चुन्याच्या मिश्रणात बांधली आहे. त्यासाठी कोरीव काळ्याभोर दगडांचा वापर केला आहे. उपसलेले पाणी बाहेर जाण्यासाठी दोन मोटांचे कालवे आहेत. विहिरीत उतरण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. पहिले मोठे असून पुरेशा रुंद पायऱ्या आहेत. विहिरीत बारमाही भरपूर पाणी असल्याने खोलीचा अंदाज आजपावेतो लागलेला नाही.
सात ते आठ फुट उंचीच्या एकावर एक अशा दोन ते तीन कमानी असल्याचे गणपती कुंभार आणि हेमंत बेले यांनी सांगितले. सध्या तुडुंब पाण्यामुळे एकच कमान दिसते. दुसरे प्रवेशद्वार अगदीच अरुंद आहे. त्याच्या पायऱ्यांवरुन कमानीपर्यंत जाता येते. बारव शोध मोहिमेत शिवानंद धुमाळ, शैलेश मोरे, योगेश कुंभार, महेश मदने आदींनी भाग घेतला.विहीरीत ऐतिहासिक तपशीलविहिरीत पाणी येण्यासाठी पाच ते सहा फूट व्यासाची दोन आडवी भुयारे आहेत. सध्या विहीर तुडुंब भरलेली असल्याने आतील रचना, बांधकाम स्पष्ट होत नाही. विहीरीतील शिलालेख, देव्हारे किंवा अन्य ऐतिहासिक तपशील खुला होण्याची गरज बारव संशोधकांनी व्यक्त केली. सांगलीत तात्यासाहेब मळ्यातही अशीच ऐतिहासिक विहीर आहे.