सदानंद औंधे- मिरज--मंत्रिमंडळ विस्तारात मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना स्थान मिळण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्या समर्थकांत उत्साह आहे. मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरू असल्याने, मंत्रिमंडळात आ. खाडे यांची वर्णी लागणार की शिवाजीराव नाईक यांची, याबाबत चर्चा सुरू आहे. आ. खाडे भाजपचे जिल्ह्यातील पहिले आमदार आहेत. मिरजेतून दोनवेळा विजय मिळविणाऱ्या खाडेंकडे नवीन सरकारमध्ये पालकमंत्रीपद जाणार असल्याच्या घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांतून झाल्या होत्या. भाजपच्या सरकार स्थापनेनंतर त्यांचे मंत्रिमंडळात स्थान निश्चित होते. मात्र त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्याचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे चार आमदार निवडून आले. चौघांनीही पक्षनेतृत्वाकडे मंत्रीपदाची मागणी केल्यानंतर, खाडे व शिवाजीराव नाईक यांना वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिले. मंत्रीपदी कोणाची निवड व्हावी, यासाठी भाजपअंतर्गत जोरदार राजकारण सुरू असून विरोधी गटाला मंत्रीपद मिळू नये यासाठी अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आ. खाडे व आ. नाईक यापैकी एकाची मंत्रिमंडळात निवड निश्चित असल्याचा समर्थकांचा दावा आहे. गतवर्षी हुलकावणी मिळाल्याने आ. खाडे यांनी यावेळी मंत्रीपदासाठी जोर लावला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात निराशा होऊ नये यासाठी त्यांनी मंत्रीपदासाठी भाजप व संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन वर्षभर फिल्डिंग लावली आहे. जुना-नवा वाद मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील चारही आमदार इच्छुक आहेत. खा. संजय पाटील यांची संदिग्ध भूमिका आहे. मिरजेतील काही जुने भाजप नेते त्यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावत आहेत. त्यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले असल्याने, मंत्रीपद देण्यासाठी काही नेत्यांचा आक्षेप आहे. मंत्रीपदावरून जुना-नवा वाद सुरू झाला आहे.
खाडेंची मंत्रीपदासाठी फिल्डिंग
By admin | Published: November 13, 2015 11:11 PM