लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : शहरातील बाजारपेठेसह मुख्य चौकांमध्ये असलेल्या पथदिव्याच्या खांबांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सुरूवातीला हे सीसीटीव्ही बंद होते. मात्र, गत काही महिन्यांपासून ही यंत्रणा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली असून पोलीस स्टेशनमध्ये बसून अधिकारी व कर्मचारी बाजारपेठेवर वॉच ठेवत आहेत. कऱ्हाड हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा ज्याप्रमाणात विस्तार होतोय त्याच प्रमाणात येथे गुन्हेगारी कारवायाही वाढतायत. या गुन्हेगारी कारवाया व शहरातील मुख्य बाजारपेठेतील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पोलिसांकडून पालिकेकडे करण्यात आली होती. त्याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला. या पत्रव्यवहाराला पालिकेकडूनही त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पाठपुराव्यानंतर शहरातील दत्त चौकापासून बसस्थानकाकडे जाणारा मार्ग व दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक ते कन्या शाळा मार्गापर्यंतच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुख्य चौक व जागा निश्चित करण्यात आल्या. पालिकेच्या सभेत त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. अखेर कंत्राटदाराच्या माध्यमातून ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आल्या. बहुतांश ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे पथदिव्यांच्या खांबांवर बसविण्यात आले. दत्त चौकापासून कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते बसस्थानकापर्यंत असलेल्या पथदिव्यांच्या खांबांवर आजही हे कॅमेरे दिसतात. मात्र, या कॅमेऱ्यांसह शहरातील इतर ठिकाणचे कॅमेरेही मध्यंतरीच्या कालावधीत शोपीस बनले होते. शहरात २०११ मध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरे पहिल्यांदा कार्यान्वित करण्यात आले. मुख्य बाजारपेठ व कन्या शाळेमार्गे चावडी चौक हा मिरवणुकीचा मार्ग असल्याने प्राधान्याने या मार्गांवर ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यानंतर कायमस्वरूपी हे कॅमेरे सुरू राहतील, असे सांगण्यात आले होते.मात्र, गणेशोत्सव संपताच सीसीटीव्हीकडेही पोलीस व पालिकेचे दुर्लक्ष झाले. एक-एक करीत सर्वच ठिकाणचे कॅमेरे बंद पडले. त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा एकदा कायमस्वरूपी सीसीटीव्ही सुरू ठेवण्यासंदर्भात कार्यवाही झाली. मात्र, तीही फोल ठरली. दरवर्षी फक्त गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रशासनाला सीसीटीव्हीची आठवण यायची. एरव्ही संबंधित कॅमेऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नव्हते. मात्र, गत काही महिन्यांपासून सीसीटीव्ही चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेचे कंट्रोल रूम सध्या शहर पोलीस ठाण्यात आहे. त्याठिकाणी ठाणे अंमलदार कक्षातच सीसीटीव्हीचे लाईव्ह फुटेज सुरू असते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह इतर ठिकाणच्या हालचालींवर पोलीस ठाण्यात बसून लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य झाले आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी होणार फायदामारामारीसह चोरीच्या व इतर गंभीर गुन्ह्यात पोलिसांना शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. यापुर्वी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी कार्यान्वित नसल्याने पोलिसांना त्याचा काहीच फायदा होत नव्हता. चोरीसारखी घटना घडली की पोलिसांना दुकाने किंवा घरांसमोर लावलेल्या खासगी सीसीटीव्हीजे फुटेज तपासावे लागत होते. मात्र, आता सीसीटीव्ही चांगल्या पद्धतीने कार्यन्वित असल्याने पोलिसांना त्याचा चांगला फायदा होणार आहे.
‘खाकी’पुढं अख्खं कऱ्हाड ‘लाईव्ह’!
By admin | Published: June 02, 2017 11:26 PM