विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या परत वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी विटा व खानापूर तालुक्यात प्रशासन रस्त्यावर उतरले. प्रांंताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी शनिवारी तालुका पिंजून काढला.
विटा शहरात अत्यावश्यक वगळता अन्य सुरू असलेल्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. भिवघाट येथे नियमांचे उल्लंघन करून सुरू ठेवण्यात आलेल्या राजेशाही हॉटेलच्या मालकांकडून दंड वसूल करण्यात आला. भिवघाट, करंजे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांनाही दंड करण्यात आला.
शनिवारी सकाळी प्रांताधिकारी भोर, तहसीलदार शेळके, पोलीस निरीक्षक डोके, मुख्याधिकारी पाटील यांच्यासह पोलीस व पालिका प्रशासनाने विटा शहरातील प्रमुख मार्गावरून लॉँगमार्च काढून अत्यावश्यक वगळता अन्य व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर नागेवाडी, भाग्यनगर, हिवरे, करंजे यासह विविध गावांना भेटी दिल्या. गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी खंबाळे (भा.) व आळसंद परिसराला भेट देऊन पाहणी केली. कोविड सेंटर व विलगीकरण कक्षाची पाहणी केली.
भिवघाट येथे पथकाचे प्रमुख चेतन कोणेकर यांना राजेशाही हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने मालकाला दंड करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांवरही कारवाई झाली. दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
चौकट :
विट्यात हॉटेल हाऊसफुल
विटा शहरात हॉटेलमधून केवळ पार्सल सेवा देण्याची परवानगी असताना अनेक हॉटेलमध्ये रात्री अकरापर्यंत ग्राहकांना बसून सेवा दिली जात आहे. रात्री हाऊसफुल गर्दी असते.
फोटो - १७०७२०२१-विटा-नागेवाडी : नागेवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह प्रशासनाने शनिवारी कोविड सेंटर व विलगीकरण कक्षाची पाहणी केली.