या निवडणुकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्यात आला. खानापूर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची प्रक्रिया सुरू होती. त्यातील तांदळगाव व भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत, तर पारे ग्रामपंचायतीच्या ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे पारे येथे दोन प्रभागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले.
तालुक्यात शुक्रवारी ११ ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांत सोशल डिस्टन्सिंगचा पुरेपूर वापर झाल्याचे पाहावयास मिळाले.
खानापूर तालुक्यातील माहुली ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत झाली. या ग्रामपंचायतीसाठी ७०.७२ टक्के, नागेवाडी - ८०.१८, पारे ६५.४७, मंगरूळ - ७९.५०, खंबाळे (भा.)- ८६.०६, भिकवडी बुद्रुक - ८१.४१, देविखिंडी - ७४.०६, रेणावी - ७४.८४, पोसेवाडी - ७१.९८, शेडगेवाडी - ८१.७२ आणि मेंगाणवाडी ग्रामपंचायतीसाठी ७६.४२ असे तालुक्यात सरासरी ७६.११ टक्के मतदान झाले.
सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निरीक्षक तथा प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, परिविक्षाधीन नायब तहसीलदार प्रतिक्षा भुते यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस उपाधीक्षक अंकुश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
चौकट
सोमवारी मतमोजणी...
खानापूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून विटा येथील खानापूर रस्त्यावर असलेल्या प्रांताधिकारी कार्यालयासमोरील शासकीय धान्य गोडावूनमध्ये सोमवार, दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून दोन ते तीन तासांत सर्व ग्रामपंचायतींचा निकाल हाती येण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितले.
फोटो - १५०१२०२१-विटा-माहुली निवडणूक : माहुली (ता. खानापूर) येथे शुक्रवारी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून मतदारांनी रांगेतून मतदानाचा हक्क बजावला.