लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : खानापूर तालुक्यात कोरोनाने ११९ नव्हे, तर ६२६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली. मृत्यूंचा आकडा लपविल्याने मृतांच्या संतप्त नातेवाइकांनी आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी ती रोखल्याने आंदोलकांशी झटापट झाली. त्यानंतर आरोग्य विभागाने मृत्यूची खरी आकडेवारी जाहीर केली.
आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात खानापूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११९ असल्याचे सांगितले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांनी विविध ठिकाणांहून माहिती घेतल्याने ही संख्या मोठी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोहिते यांनी आरोग्य विभागाने मृत्यू झालेल्या रुग्णांची खरी आकडेवारी जाहीर करावी अन्यथा आरोग्य विभागाची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी शंकर मोहिते, नगरसेवक दहावीर शितोळे, अमर शितोळे, विठ्ठलराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांनी तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला.
हा मोर्चा गणेश पेठेजवळ आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या खांद्यावर असलेली तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे यांच्यासह पोलिसांनी तिरडी हिसकावून घेतली. त्यानंतर आरोग्य विभागाविरोधात घोषणा देत आंदोलक तहसील आवारात आले. तेथे तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, तालुका आरोग्याधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. आरोग्याधिकारी डॉ. लोखंडे यांनी खानापूर तालुक्यात कोरोनाने ११९ नव्हे तर ६२६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पोर्टलवरून मिळाल्याचे सांगितले.
चौकट
सर्व मृतांची यादी शासनाला सादर होणार
खानापूर तालुक्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या सर्व ६२६ रुग्णांची यादी शासनाला सादर करून नातेवाइकांना न्याय दिला जाईल. कोणताही नातेवाईक लाभापासून वंचित राहणार नसल्याचे आश्वासन डॉ. अनिल लोखंडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.