जत/बिळूर : नात्यातील तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून खिलारवाडी (ता. जत) येथे जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून व डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता घडली. सुप्रिया सूर्याबा लोखंडे (वय १८) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश ऊर्फ सूर्याबा बाबू लोखंडे (४५) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सुप्रियाचा नातेवाईक जगन्नाथ बाळासाहेब लोखंडे याने जत पोलिसांत फिर्याद दिली आहे.खिलारवाडी गावालगत सूर्याबा लोखंडे यांची शेतजमीन आहे. पत्नी मायाक्का, एक मुलगा व तीन मुलींसमवेत ते मळ्यात राहतात. सुप्रिया त्यांची मोठी मुलगी होती. दोन वर्षांपूर्वी तिने दहावीमधून शाळा बंद केली होती. सध्या ती घरीच असे. त्यांच्या घरापासून जवळच भावकीतील जगन्नाथ बाळासाहेब लोखंडे याचे घर आहे. सुप्रिया व जगन्नाथ वरचे वर मोबाईलवरून बोलत होते. सुप्रिया आणि जगन्नाथयांच्यात अनैतिक संबंध आहेत, असा संशय सूर्याबा याला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत होते. सुप्रियाचे वारंवार जगन्नाथशी फोनवर बोलणे सूर्याबाला पसंत नव्हते. ‘जगन्नाथ नात्याने तुला चुलत भाऊ लागतो, तेव्हा हे योग्य नाही. तुमच्या भानगडीमुळे समाजात माझी बदनामी होत आहे’, अशी समज सुर्याबा याने सुप्रियाला दिली होती. परंतु सुप्रियाने त्याकडे दुर्लक्ष करून, जगन्नाथशी सतत संपर्क ठेवला होता. याच कारणावरून २० सप्टेंबररोजी जगन्नाथशी सूर्याबाचे भांडण झाले होते. मंगळवारीही पुन्हा असाच प्रकार घडल्याने संतापलेल्या सूर्याबाने सुप्रियाचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून तिचा खून केला.याप्रकरणी जगन्नाथ लोखंडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सुप्रियाशी फोनवरून बोलत होतो. आमच्यात कोणतेही चुकीचे संबंध नव्हते. सुप्रियाच्या मदतीने गावातीलच एका मुलीला लग्नाची मागणी घालण्याचा माझा प्रयत्न होता. सुप्रियाने माझी त्या मुलीशी गाठही घालून दिली होती. पण नंतर ती मुलगी माझ्याशी बोलायची बंद झाली. त्यामुळे मी सुप्रियाला मध्यस्थी करण्याविषयी विनवणी करत होतो. याबाबत सुप्रियाला फोन करून विचारणा करत होतो. परंतु सुप्रियाच्या वडिलांनी याचा चुकीचा अर्थ काढून २० सप्टेंबररोजी माझ्याशी भांडण काढले. त्यावेळीही वाद झाला होता. त्यानंतर सुप्रियाचे कुटुंब मंगळवारी गाव सोडून गोव्याला कामाला निघाले होते. ही गोष्ट मला सुप्रियाने फोनवरून सांगितली. मी मंगळवारी वडाप जीप घेऊन त्यांना आणण्यासाठी व हा वाद मिटविण्यासाठी गुगवाड फाट्यापर्यंत गेलो. तेव्हा तिथे तिची आई मायाक्का हिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. लोक जमू लागल्याने मी तिथून निघून आलो.या प्रकरणानंतर सुप्रिया, तिची आई मायाक्का व वडील सूर्याबा पुन्हा खिलारवाडी येथे वस्तीवरील घरी आले. तेथे पुन्हा बाप-लेकीत वाद झाला. रागाच्या भरात सूर्याबा याने मारहाण करून सुप्रियाचा गळा दाबून, डोक्यात दगड घालूनखून केला. या घटनेनंतर प्रकरण मिटवून रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. दरम्यान, जगन्नाथने पोलिसांना याबाबत माहिती कळविल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वडील सूर्याबा यास ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी सुप्रियाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून सकाळी अकरा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सूर्याबा लोखंडे याला अटक करण्यात आली असून फिर्यादी जगन्नाथ लोखंडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत मृत सुप्रियाची आई मायाक्का हिची फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.
खिलारवाडीत बापाकडून मुलीचा खून; प्रेमप्रकरणाच्या संशयाने कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:58 PM