अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा न झाल्यामुळे खरिपाच्या केवळ ८३ टक्केच पेरण्या झाल्या. त्यानंतरही पावसाचा जोर नसल्यामुळे दुष्काळी तालुक्यातील पेरण्या पूर्णत: वाया गेल्या आहेत. आता आॅक्टोबर महिना निम्मा संपला तरी, परतीचा मान्सून पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीच्या पेरण्याही पूर्णत: खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात केवळ ६ टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्यामुळे निम्म्या जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आले आहे.जिल्ह्यात दोन लाख ७५ हजार ४२९ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र होते. त्यापैकी दोन लाख २७ हजार ५७२ हेक्टरवर म्हणजे ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. उर्वरित १७ टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. मान्सूनपूर्व पावसाने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व तालुक्यात हजेरी लावली होती. त्यावर लगेचच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण, त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली. त्यामुळे फूटभर उगवून आल्यानंतर पिके वाळून गेली आहेत.जिल्ह्यात सोयाबीनचे ५७ हजार १४६ हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ३९ हजार १५९ हेक्टरवरच म्हणजे ६९ टक्के पेरणी झाली होती. ३१ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणीच झाली नाही. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप मका पिकाचे जिल्ह्यात सरासरी ३० हजार ३१० हेक्टर क्षेत्र होते. यामध्ये पाच हजार हेक्टरने वाढ होऊन ३५ हजार ५०८ हेक्टरवर पेरणी झाली होती. कमी कालावधित खात्रीशीर उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. कडधान्याची केवळ ५३ टक्के पेरणी झाली असून कापसाची तर केवळ ३ टक्केच टोकण झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात काही गावातच कापूस लागवड केली जाते.खरीप हंगामाचे विदारक चित्र असताना, शेतकरी परतीच्या पावसाकडे लक्ष ठेवून होता. जमिनीची मशागत करून शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सज्ज असताना, परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यात रब्बीचे दोन लाख ५१ हजार ४६७ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ १५ हजार ९२० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तिची टक्केवारी केवळ ६ टक्के आहे.रब्बी हंगामातील पेरणी सर्वसाधारणपणे १ आॅक्टोबरपासून सुरू होते. परंतु, पुरेसा पाऊस नसल्यामुळे यावेळी पेरण्याच नाहीत. वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी रब्बीच्या पेरण्या सुरु केल्या आहेत. विहिरी, पाणीपुरवठा योजनांमधून पाणी देऊन गहू, हरभरा, ज्वारी, रब्बी मका पेरणीस सुरुवात केली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्व तालुक्यातील शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरण्याच सुरू केलेल्या नाहीत. परतीच्या पावसाचा जोर नसल्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. निम्म्या जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे.विहिरी, तलावांनी : तळ गाठलानिम्म्या जिल्ह्यात मान्सून आणि परतीचा पाऊसच झाला नसल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील पाझर तलाव आणि विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प ७९ असून, यापैकी वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यातील दहा लघु प्रकल्पांतच १०० टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व प्रकल्पात २५ ते ३५ टक्केच पाणीसाठा आहे. यामुळे जत, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनास टँकर सुरु करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजनही सुरु केले आहे.
खरीप हंगाम गेला वाया, रब्बीवरही संकट दाटले; निम्म्या सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:53 PM