खरसुंडी : खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असून हे देवस्थान विकासापासून वंचित राहिले आहे. भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी या देवस्थानचा ’ब’ वर्गात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
खरसुंडी (ता. आटपाडी) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पडळकर म्हणाले सांगली जिल्ह्यातील आरेवाडी देवस्थानला चांगल्या सुविधा झाल्या आहेत. मात्र खरसुंडीत भाविकांसाठी पुरेशा सेवा-सुविधा नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. यामुळे हे देवस्थान ‘ब’ वर्गात समावेश झाल्यास पुरेसा निधी मिळेल आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
यावेळी सरपंच लता अर्जुन सावकार यांनी विकास कामासाठी निधीची मागणी केली. यावेळी भाऊसाहेब गायकवाड, उपसरपंच सलिमा शिकलगार, जितेंद्र पाटील, महादेव सावकार, विजयकुमार भांगे, धोंडीराम इंगवले, विलास कालेबग, दीपक जाधव, तानाजी क्षीरसागर आदी उपस्थित होते. विनोद पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. सादिक शिकलगार यांनी आभार मानले.