खरसुंडी : तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ देवस्थानच्या विविध उत्सव सोहळ्यांपैकी एक पारधीपौर्णिमा उत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे.
भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने प्रशासनाच्या निर्देशाने निर्णय घेतला आहे. दरवर्षी माघपौर्णिमेनिमित्त सिद्धनाथ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. सिद्धनाथाची उत्सवमूर्तीसह गावातूनच पालखी निघते. या सिध्दनाथाच्या धार्मिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनामुळे यावर्षी सोहळा रद्द झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धनाथ मंदिर शुक्रवार व शनिवार दोन दिवसांसाठी देवदर्शनासाठी पूर्णत: बंद राहणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी आणि शासनाने सांगितलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.