आटपाडी : कोरोनाचे रुग्ण तालुक्यात झपाट्याने वाढत असताना खरसुंडी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याने नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्र करून चक्क वाढदिवस साजरा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत डॉ. एम. एस. जाधव यांच्याविरुद्ध थेट मुख्यमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते अशोक जुगदर यांनी तक्रार केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कारवाईचे आदेश दिले आहेत.
अशोक जुगदर (रा. जांभुळणी, ता. आटपाडी) यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. एम. एस. जाधव यांनी दि. १६ एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात त्यांचा वाढदिवस साजरा केला. सध्या कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती असताना या डॉक्टरांनी ग्रामस्थ आणि शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्र केले. शासकीय रुग्णालयाचा खासगी कार्यक्रमासाठी वापर केला. पदाचा गैरवापर केला. शासकीय नियमांचे पालन केले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जुगदर यांना तक्रारीची दखल घेत याप्रकरणी कारवाई करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सामाजिक आरोग्य विभागास तक्रार पाठविल्याचे मेलद्वारे कळविले आहे.
चौकट
तक्रारीसोबत छायाचित्रांचे पुरावे!
जुगदर यांनी मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांना पाठविलेल्या तक्रारीसोबत या डॉक्टरांनी साजरा केलेल्या वाढदिवसाची छायाचित्रे पाठविली आहेत. त्यामध्ये डॉक्टरांचा शाल, श्रीफळ देऊन केलेला सत्कार, केक कापताना आणि भरवितानाची, सेल्फी काढतानाची छायाचित्रे आहेत.