अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : दोन वर्षांपूर्वी नगरपालिका आरोग्य विभागात नवीन कचरागाड्या दाखल झाल्या होत्या. त्यांची अवस्था आता कालबाह्य वाहनांपेक्षाही वाईट झाली आहे. शहरातील स्वच्छतेची अवस्था पाहता आरोग्य विभागाचा खेळखंडोबा झाला आहे.
पालिकेत गेल्या चार वर्षात चार आरोग्य सभापती झाले. मात्र ‘सभापतींची नावे सांगा आणि हजार रुपये मिळवा’, अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील कारभार रामभरोसे आहे. प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याने आरोग्य विभाग ‘सलाईन’वर आहे.
सध्या अग्निशामक दलाच्या गाडीच्या भाेंग्याचा आवाज वेगापेक्षा दुप्पट आहे. यापेक्षाही वाईट परिस्थिती कचरा गाड्यांची आहे. या गाड्यांवरील चालकाकडे वाहन चालवण्याचा परवानाच नाही. त्यामुळेच देखभाल वेळेवर होत नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात कचऱ्याच्या गाड्या आणि कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे नियमितपणे कचरा उचलला जात नाही. वेळच्यावेळी गटारी उपसल्या जात नाहीत. जुजबी औषध फवारणी केली जाते. यामुळे डास, चिलटांचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिकेची सत्ता विकास आघाडीकडे आणि सभापती मात्र राष्ट्रवादीकडे असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. प्रशासनातील अधिकारी मात्र याचा फायदा उठवत आहेत.
कोट
आरोग्य सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दररोज नियोजन केले जाते. वेळापत्रक आखले जाते. कचरा गाड्यांवरील चालक व कामगार निष्काळजीपणा करतात. त्यामुळे या गाड्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे बसविण्याचे नियोजन आहे.
- विश्वास डांगे, आरोग्य सभापती