सांगली : जीवनज्योती कॅन्सर रिलीफ आणि केअर ट्रस्टच्यावतीने सांगलीत ‘खिचडी घर’ सुरू करण्यात आले. दररोज सकाळी आठ ते दहा या वेळेत गोरगरिबांना खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे.समाजातील गोरगरिबांसाठी ३७ वर्षापूर्वी मुंबईत सावला यांनी ट्रस्टची स्थापना केली. कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोनवेळचे जेवण मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला. या ट्रस्टची शाखा सांगलीतही सुरू करण्यात आली. सांगलीतील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दररोज नातेवाईक व रुग्णांना मोफत जेवण दिले जाते. आता ट्रस्टच्यावतीने ‘खिचडी घर’ या नव्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.पटेल चौकातील श्री अमिझरा पार्श्वनाथ देहरासर येथे रविवारी खिचडी घराची सुरूवात करण्यात आली.यावेळी ट्रस्टच्या सांगली विभागाच्या अध्यक्षा मीना मारू, देहरासरचे अध्यक्ष तेजपाल शहा, गुजराती सेवा समाजचे अध्यक्ष कांतिभाई वामजा, हरिश लालन, जेठाभाई छेडा आदी उपस्थित होते.सावला म्हणाले की, ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे ऋण आपण फेडले पाहिजेत. त्याच हेतूने ट्रस्टची स्थापना केली. मोफत जेवणापासून सुरूवात केली. आज ८० विविध उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून राबविले जातात. गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी सांगली विभागाने खिचडी घर सुरू केले, हा उपक्रम स्तुत्य आहे.सांगली विभागाच्या अध्यक्षा मीना मारू यांनी स्वागत केले. यावेळी भक्ती गाला, आशा गडा, भरत छेडा, मनीष कोठारी, रितेश मेहता, चंद्रप्रभाबेन शहा, नवलबेन खोना, आशाबेन मजेठिया, अतुल ठक्कर उपस्थित होते.नागरिकांनी दान करावे : मीना मारूट्रस्टच्यावतीने कॅन्सरग्रस्त रुग्णांसह दिव्यांग व गोरग्रिबांनाही मदतीचा हात दिला जात आहे. पशु-पक्ष्यांच्या पिलांसाठी आसरा देऊन औषधोपचारही केले जातात. नागरिकांनी घरातील रद्दी, जुनी खेळणी, सुस्थितीतील कपडे, पडून असलेली औषधे दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मीना मारू यांनी केले.
सांगलीत ‘खिचडी घर’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:09 AM