लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व आष्ट्याचे वैभव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्यापाठोपाठ आता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांचे पुत्र सागर खोत यांच्याही प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. तथापि खोत आणि शिंदे पिता-पुत्रांच्या भूमिकांवर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेश यात्रेसाठी राष्ट्रवादी पुरस्कृत उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी वडगाव (ता. मावळ) येथे जाऊन पाच हजार रुपयांची मदत खासदार शेट्टी यांच्याकडे दिली.कृषी राज्यमंत्री खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाळवा तालुक्यात आमंत्रित केले आहे. यावेळी तालुक्यातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश व्हावा, यासाठी खोत यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यत: राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे आणि त्यांचे पुत्र वैभव शिंदे यांच्या प्रवेशासाठी त्यांनी कंबर कसली आहे. सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर भाजपमध्ये जाण्यास सध्यातरी इच्छुक नाहीत. माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे आणि काँग्रेसचा एक पदाधिकारी खोत यांच्या गळाला लागला असून, ते २९ तारखेला भाजपवासी होणार आहेत.आष्टा येथे विलासराव शिंदे, वैभव शिंदे, स्वरूपराव पाटील, झुंझारराव पाटील आणि मोजक्याच कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी शुक्रवार, दि. २६ रोजी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रवेशाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे विलासराव शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. वैभव शिंदे यांनी मात्र काहीही झाले तरी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील व आप्पासाहेब पाटील यांनी आत्मक्लेश यात्रेसाठी बुधवारी वडगाव (ता. मावळ) येथे जाऊन खासदार शेट्टी यांच्याकडे पाच हजार रुपयांची मदत दिली. विकास आघाडीतील बहुतांशी नगरसेवक या यात्रेत सामील होणार असल्याचे समजते.राजू शेट्टींना मदत : राजकारणाचा भाग नाही...मी एक सामान्य शेतकरी आहे. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. राजकारणाचा भाग वगळता, आत्मक्लेश यात्रेस मदत करणे माझे कर्तव्यच आहे. त्यामुळे मी यात्रेस आर्थिक मदत केली आहे, असे मत इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
खोत, शिंदे पिता-पुत्रांच्या भूमिकेने उलट-सुलट चर्चा
By admin | Published: May 24, 2017 11:31 PM