सांगली : चारचाकी मोटारीत उधारीवर डिझेल दिले नसल्याच्या कारणावरुन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. शनिवार रात्री साडेदहा वाजण्याच्यासुमारास अंकली-मिरज रस्त्यावरील एचपी पंपावर हा प्रकार घडला.याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.वैभव तात्यासाहेब खवाटे (वय ३३, रा. कुंभार गल्ली, अंकली), ओंकार दिलीप माने (२८, रा. वर्षा प्रसन्ना अपार्टमेंट, पटवर्धन हायस्कूलसमोर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या सुहास अर्जुन कांबळे (१९, रा. नागोबा मंदिरजवळ, अंकली) याने पोलिसांत फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुहास कांबळे हा अंकलीत राहतो. तो मिरज रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपावर काम करतो. शनिवारी रात्री संशयित वैभव खवाटे आणि ओंकार माने हे तेथे आले. त्यांनी आपल्याकडील चारचाकीत उधारीवर डिझेल देत नसल्याने सुहासला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी पंपावरील दुसरा कर्मचारी अण्णासाहेब कांबळे याने मध्यस्थी केली. परंतु संशयितांनी त्यालाही शिवीगाळ करून दमदाटी केली.याबाबत सुहास कांबळे याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी वैभव खवाटे आणि ओंकार माने यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पेट्रोलपंप चालकास फोनवरुन धमकी
संशयितांनी मारहाण करून सुहासला जबरदस्तीने चारचाकी मोटारीत घालून अंकली फाटा येथून कोल्हापूर-सांगली रस्त्याने सांगलीच्या बसस्थानकावर नेलेे. त्यानंतर संशयितांनी पेट्रोल पंपाचे मालक जोशी यांना फोन करून त्यांनाही शिवीगाळ केली. तू पंप कसा चालवतोस, ते मी बघतोच, अशी धमकी दिली