सांगली : आठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.
राकेश मधुकर कदम (वय २८, रा. हनुमाननगर, पाचवी गल्ली, सांगली) व सनी विजयकुमार सहानी (२०, मंगळवार बाजार, कुपवाड रस्ता, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आठवड्यापूर्वी त्यांनी श्रीनाथ पंडित याचे मार्केट यार्डमधून अपहरण केले होते. याप्रकरणी त्याची आई सुजाता पंडित यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
गेली आठ दिवस विश्रामबाग पोलिस राकेश कदमचा शोध घेत होते. पण त्याचा सुगावा लागत नव्हता. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख गुंडाविरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते.
राकेश कदम हा श्रीनाथला घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यात आश्रयाला असल्याची गुंडाविरोधी पथकाला मिळाली. सोमवारी रात्रीच पथक कवठेमहांकाळला रवाना झाले. स्थानिक नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर राकेश कदम हा चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर शेतात लपून बसल्याचीे माहिती मिळाली.
तिघांची अंगझडती घेतल्यानंतर दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, कोयता, सत्तूर या धारदार शस्त्रासह एक जिलेटीन कांडीही सापडली. ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तिघांना घेऊन दुपारी पथक सांगलीत दाखल झाले.
अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी राकेशसह तिघांची कसून चौकशी केली. त्यांच्याविरुद्ध अपहरण, बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपहृत श्रीनाथला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिस निरीक्षक राजन माने, सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, हवालदार महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सागर लवटे, योगेश खराडे, सचिन कुंभार, किरण खोत, मोतीराम खोत, संकेत कानडे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.राकेशचा...राक्या मुंडकं!राकेश कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ त्याने कऱ्हाड (जि. सातारा) येथील तरुणाचा गळा चिरुन खून केला होता. त्याचे मुंडके कृष्णा नदीत फेकून दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचाही त्याने अशाचप्रकारे धामणी रस्त्यावर खून केला होता. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंडके तोडून दोन्ही खून केल्याचे त्याचे नाव राक्या मुंडकं पडले आहेत.खुनी हल्ल्याचा बदलाअपहृत श्रीनाथच्या भावाने राकेश कदम याच्यावर ६ नोव्हेंबर २०१७ रोजी खुनीहल्ला केला होता. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. गेल्या आठवड्यात त्याने हल्ल्याचे हे प्रकरण मिटवायचे आहे, असे सांगून श्रीनाथला मार्केट यार्डात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने श्रीनाथचे अपहरण केले. श्रीनाथच्या भावाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण केल्याची कबूली राकेशने दिली आहे.