सांगली : शहरातील रेल्वेस्थानक परिसरात खेळणा-या तीन अल्पवयीन मुलांना आमिष दाखवून रेल्वेतून घेऊन जाणा-या संशयितास शिताफीने पकडण्यात आले. नागरिकांची सतर्कता आणि विश्रामबाग व सातारा पोलिसांच्या समन्वयामुळे रात्रीतच साता-यातून तीन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. रमेश श्रीरंग झेंडे (वय २५, रा. बलवडी, ता. खानापूर, सध्या घाटकोपर, मुंबई) असे पकडण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.
शहरातील हनुमाननगर परिसरातील तीन मुले बुधवारी सायंकाळी फिरत फिरत सांगलीतील रेल्वेस्थानक परिसरात गेली होती. याचवेळी मुंबईला जाण्यासाठी संशयित रमेश झेंडे रेल्वे स्थानकावर आला होता. तीन मुलांशी बोलत असताना त्याने त्यातील एका मुलास, ‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला.
सायंकाळपासून मुले घरी नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर मुलांच्या पालकांनी नगरसेवक अभिजित भोसले यांच्याशी संपर्क साधून झालेली घटना सांगितली. त्यानंतर तरुणांनी गट करून शहरात त्यांचा शोध सुरू केला. याचदरम्यान मुलांच्या पालकांनी विश्रामबाग पोलिसात मुले बेपत्ता असल्याबाबत माहिती दिली.
शोधमोहीम सुरू असतानाच रात्री अकराच्या सुमारास माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे यांनी नगरसेवक भोसले यांना मोबाईलवरून हनुमाननगर येथील तीन मुले महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून संदिग्धपणे प्रवास करत असल्याची व त्यांच्यासोबत एक संशयित असल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने संपर्क साधून या रेल्वेगाडीतील मार्गरक्षक असलेल्या विकास भोले यांनाही कळविले. दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, रमेश तावरे व संदीप घस्ते यांनी सातारा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत तीन मुलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकावर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली व रमेश झेंडेला ताब्यात घेण्यात आले. तसा संदेश मिळताच पोलिस पथक, पालक आणि भोसले साता-याला गेले. तेथे मुलांना ताब्यात घेण्यात आले.अपहरणाचे कारण अस्पष्टतीन मुलांना मुंबईला घेऊन जाणारा संशयित रमेश झेंडे मूळचा बलवडीचा असला तरी मुंबई महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समजते. तो स्वभावाने विक्षिप्त असल्याने तीन मुलांना घेऊन जाण्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता, याबाबत अस्पष्टता होती.