सांगली : गांधींना मारले ते बरे झाले, जिवंत असते तर सध्याची अवस्था पाहून दररोज मेले असते, असे प्रतिपादन गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनीदेखील आपण भीतीच्या वातावरणातच राहत आहोत, असे ते म्हणाले.सांगलीत शुक्रवारी शांतिनिकेतन लोकविद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. बाबुराव गुरव, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, किरण लाड आदी उपस्थित होते. सकाळी आमराईपासून शांतिनिकेतनपर्यंत रॅली काढण्यात आली. ७५ स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार झाला.गांधी म्हणाले की, प्रतिसरकारची गरज आजही आहे. सध्याचे सरकार गद्दारांचे आहे. यातीलच काही लोक स्वातंत्र्यलढ्यावेळी ब्रिटिशांसोबत होते, तरीही आपण निर्लज्जपणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. जात, धर्म, लिंगाच्या आधारे माणसांची विभागणी सुरू आहे.महाराव म्हणाले की, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत दररोज फसवणूक सुरू आहे. गोमूत्रासोबत पंचगव्य म्हणून शेण खायला लावले, आता हलाल आणि झटक्याचा वाद सुरू केलाय. अशाने देश सुधारणार कसा? आंबे खाऊन मुले कशी होतील? हे लोक खोटे आहेत. द्वेष पसरवणारा धर्म सांगत आहेत.आ. लाड म्हणाले की, सध्याचे सरकार लबाड आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने लढ्याची आवश्यकता आहे. नोकऱ्या, उदरनिर्वाह, उद्योगधंदे अशा अनेक समस्या आहेत.यावेळी प्रसाद कुलकर्णी, ॲड. सुभाष पाटील, संपतराव पवार, उमेश देशमुख, व्ही. वाय. पाटील, धनाजी गुरव, रमेश सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिन साजरा केला नाहीतुषार गांधी म्हणाले की, राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्याला सवर्ण शिक्षकाने जीवे मारले. त्यावर पंतप्रधानांनी एकही शब्द काढला नाही. दिल्लीतील बलात्कारानंतर लोक रस्त्यावर आले, पण बिल्कीस बानू मुस्लीम आहे म्हणून कोणीही आवाज उठवला नाही. याच्या निषेधार्थ मी यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही.