सांगली : फळांचा राजा अर्थात आंबा या आठवड्यात बाजारात दाखल झाला. उपलब्ध आंब्याचे दरही आवाक्याबाहेर असले तरी आवकेतील वाढ लक्षात घेता लवकरच सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता येणार आहे. या आठवड्यात खाद्य तेलांच्या दरात सरासरी २० रूपयांनी वाढ झाली तर तांदळाच्या दरात क्विंटलमागे १० ते १५ रूपयांची वाढ झाली आहे. कांदा, लसूण आणि बटाट्याचेही दर वाढले आहेत.
कोकणासह कर्नाटकातून येणाऱ्या आंब्याची फळ मार्केटमध्ये आवक वाढत आहे. सरासरी ४०० ते ५०० रूपये डझनाचे दर असले तरी काही ठिकाणी वाढीव दरानेही विक्री सुरू आहे. कलिंगड, टरबूजाची मोठी आवक या आठवड्यात झाली आहे. पंधरवड्यात अजून आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
किराणा मालाच्या दरातील वाढ त्रासदायक ठरत आहेत. आवकेवरच परिणाम झाल्याने तेल, डाळी आणि तांदूळ, गव्हाच्या दरातील वाढ कायम आहे. नवीन तांदूळ बाजारात येत असला तरी दरातील वाढ कायम आहे. खाद्य तेलाने दराचा उच्चांक गाठला आहे.
चाैकट
आंबा आवाक्याबाहेरच
शहरातील फळ विक्रेत्यांकडे आंबा उपलब्ध झाला असला तरी त्याचे दर अद्यापही चढेच आहेत. आणि त्यामानाने आंब्याची चव रसाळ नसल्याचे ग्राहकांनी सांगितले. तरीही आंब्याला मागणी वाढत आहे. या हंगामातील पहिला आंबा म्हणून उत्सुकतेपोटी ग्राहक आंबा खरेदी करत आहेत.
चौकट
भाजीपाला दर स्थिर
गेल्या आठवड्यापर्यंत भाजीपाल्याच्या दरातील वाढ थांबून दर स्थिर झाले आहेत. वांगी, दोडका, गवारीसह अन्य भाज्या सरासरी ४० ते ५० रूपयांना मिळत आहेत. कोथिंबिरीचीही आवक वाढली आहे.
कोट
कोकणातील आंबा आता उपलब्ध होत आहे. त्यास मागणीही चांगली आहे. कलिंगड, टरबूजही उपलब्ध आहेत. उन्हाळ्यात परदेशी फळांना तितकी मागणी नसते त्यामुळे स्थानिकसह देशी फळांची आवक व विक्रीसाठी मालही वाढवला आहे.
इम्रान शेख, व्यापारी
कोट
उन्हाळा सुरू झाल्याने घरोघरी वाळवणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारे बटाटे, डाळी, साबुदाणा दरात वाढच होत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा वर्षभरासाठी लागणारे उन्हाळ काम करता येणार नाही.
सोनाली पवार, गृहिणी
कोट
महिनाभरापासून अपवाद वगळता दररोज तेलाच्या दरात वाढच होत आहे. दर वाढतच चालल्याने ग्राहकांकडून काहीशी मागणीही कमी आली आहे. किराणा मालाचे इतर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गहू आणि तांदळाचे दर मात्र, स्थिर राहतील असा अंदाज आहे.
महेश ढवळे, व्यापारी.