सांगली : रत्नागिरीच्या आंबा उत्पादकांना थेट आंबाविक्री करता यावी आणि ग्राहकांना उत्पादकांकडून त्याच्या खरेदीचा व दर्जाचा लाभ मिळावा, म्हणून आयोजित केलेल्या सांगलीतील आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी ग्राहकराजा पावला. अवघ्या तीन तासात चार टन हापूस आंब्याची विक्री झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी दिली.नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी सांगलीतील मार्केट यार्डात गुरुवारी आंबा महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सवाची सुरुवात झाली.
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्याहस्ते झाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक सरव्यवस्थापक अनिल पवार व सचिव एन. एम. हुल्याळकर, व्ही. जे. राजेशिर्के व बाजार समितीचे संचालक, अधिकारी उपस्थित होते.आंबा महोत्सवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण वीस आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. सांगली शहरातील ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकविलेला व अस्सल हापूस आंबा चाखावयास मिळावा, या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन सांगली शहरामध्ये करण्यात आले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा मध्यस्थांशिवाय थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना रास्त दरात उपलब्ध करण्यात आला आहे.
पहिल्या चार तासात तब्बल चार टन आंब्याची विक्री झाली. तीनशे ते पाचशे रुपये डझन असा सरासरी दर असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारातील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवनमध्ये २० मेपर्यंत हा महोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरु राहणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती पाटील व सचिव हुल्याळकर यांनी केले आहे.