फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव ते कुकटोळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
महेश देसाई
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात विविध रस्त्यांवर खड्ड्यांचे व रस्त्याकडेला काटेरी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहेत.
शिरढोण ते मळणगाव रस्ता, कवठेमहांकाळ शहरातील कुची काॅर्नर ते जत रोड, विद्यानगर परिसरात जाणार रस्ता, हिंगणगाव ते कुकटोळी रस्ता यासह तालुक्यातील अनेक रस्ते खड्ड्यांत अखंड बुडाले आहेत. या रस्त्यांवरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच लहान-मोठे अपघात घडत आहेत. यात अनेकजण जायबंद होत आहेत. वाहनांचेही नुकसान होऊन अतिरिक्त आर्थिक भार वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
हिंगणगाव ते कुकटोळी रस्ता अगदी निकृष्ट दर्जाचा असून, या रस्त्यावर कुकटोळी गावापर्यंत खड्डेच खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम विभाग याकडे बघ्याची भूमिका घेत आहे. खड्डे मुजवण्याचे काम कधी करणार? असा प्रश्न या भागातील प्रवाशांतून विचारला जात आहे.
चौकट-
कवठेमहांकाळ तालुक्यातील व शहरातील रस्ते खड्ड्यांनी व्यापल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे तात्काळ हे रस्ते दुरूस्त करण्यात यावेत अन्यथा आरपीआयच्यावतीने तीव्र आंदोलन करू.
- बाळासाहेब ऊर्फ पिंटू माने, तालुका अध्यक्ष, आरपीआय.