कवठेमहांकाळ : देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी खालसा झाल्या पाहिजेत. इनाम वर्ग ३ च्या जमिनीच्या सातबारा पत्रकी कब्जेदार सदरी काढून टाकण्यात आलेली नावे पूर्ववत करावीत. त्याचबरोबर पीक कर्ज मिळावे, अन्यथा राज्य शासनाच्या विरोधात किसान सभा तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. उदय नारकर दिला आहे.
किसान सभेच्या वतीने कवठेमहांकाळ येथे देवस्थान जमिनींच्या विविध प्रश्नांबाबत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी मार्गदर्शन केले. उमेश देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देवस्थान जमिनींच्या प्रश्नांबाबत २५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
गुरव क्रांती संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक गुरव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. शहाजी गुरव यांनी इनामदार शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. ॲड. नितीन पाटील यांनी इनाम जमिनीबाबत कायदेशीर बाबींची माहिती दिली. बळीराजा पार्टीचे महासचिव बाळासाहेब रास्ते यांनीही आंदाेलनास पाठिंबा व्यक्त केला.
किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस दिगंबर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. जावेद मुजावर यांनी आभार मानले. यावेळी गुलाब मुलानी, चंद्रकांत गोडबोले, बाळासाहेब गुरव, युवराज गुरव, शिवाजी अभंगराव, बंडू जाधव, रमेश पाटील, मस्जिद शिरोळकर, लतीफ शिरोळकर उपस्थित होते.