- विश्वास पाटील -
ग्रेसमधील राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेता’ म्हणून पतंगराव कदम यांचा कोल्हापूरच्या राजकारणातही चांगलाच दबदबा होता. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते मदत करीत असत. दिवंगत नेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी मात्र त्यांचे सर्वांत जास्त सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीस कदम यांनी आर्थिक मदत केली.
‘एक अत्यंत मोकळा-ढाकळा, सडेतोड बोलणारा नेता’, अशी पतंगराव कदम यांची प्रतिमा होती. पतंगराव कदम व मंडलिक हे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांचे शिष्य, तसेच विक्रमसिंह घाटगे यांचेही यशवंतराव मोहिते यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध; परंतु पतंगराव व मंडलिक यांच्यातील राजकीय सख्य जास्त राहिले. यशवंतराव मोहिते यांनी पतंगराव यांना एस. टी. महामंडळाचे सदस्य केल्याने तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
पुढे याच मोहिते यांनी सहकारमंत्री असताना मंडलिक यांना शेतकरी संघावर प्रशासक म्हणून नियुक्त केले होते. त्यावेळी मंडलिक, अशोकराव साळोखे, गणी फरास, पी. बी. पोवार ही जिल्ह्याच्या राजकारणातील ‘मोहिते गटाची टीम’ म्हणून ओळखली जात होती. पतंगराव व मंडलिक हे मोहिते यांना राजकारणातील गुरू मानत असत. हा धागा त्या दोघांना एकत्र आणण्यात महत्त्वाचा होता. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार जाऊन सन १९९९ ला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यावर पतंगराव कदम हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले. पतंगराव यांच्या व्यक्तिमत्त्वात कधीच आत एक व बाहेर एक असे नसे. त्यामुळे ते सर्वांनाच मदत करीत. हा त्यांचा स्वभावच त्यावेळी काँग्रेसअंतर्गत राजकारणात त्यांच्या अडचणीचा ठरला व जेव्हा पुन्हा काँग्रेसचीच सत्ता राज्यात आली तेव्हा मात्र पालकमंत्रिपद हर्षवर्धन पाटील यांच्याकडे गेले.
मंडलिक यांच्याइतकेच पतंगराव कदम यांनी आमदार सतेज पाटील यांना राजकीय पाठबळ दिले. मुख्यत: विधान परिषदेच्या गेल्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून त्यांनी सहकार्य केले. त्यांचा अखेरचा कोल्हापूर दौराही सतेज पाटील यांनीच आयोजित केला होता. कोल्हापुरातील राजोपाध्येनगरात १ डिसेंबर २०१७ ला झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पतंगराव यांनी त्यांच्या मूळ स्वभावानुसार ‘राजकीय बॉम्ब’ टाकला होता. आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे राजकीय वैर माहीत असूनही पतंगराव यांनी सतेज पाटील यांच्यासमोरच ‘महाडिक यांनी काँग्रेसमध्ये यावे,’ असे जाहीर विधान केले होते. महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढविली ही त्यांची चूक होती, असेही त्या मेळाव्यात म्हणाले होते. मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्या राजकीय संघर्षातही समेट घडवून आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले; परंतु जेव्हा तो घडत नाही म्हटल्यावर मात्र मंडलिक यांना राजकीय बळ दिले.कोल्हापुरात संस्थांचे जाळे
ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून कोल्हापुरात ही शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारले. त्यामध्ये न्यू लॉ कॉलेज, कॉलेज आॅफ फार्मसी, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, भारती विद्यापीठ स्कूल यांचा समावेश आहे. याद्वारे त्यांनी कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.