आष्टा : वाळवा येथील किरण महादेव कावडे (वय १८. रा. श्रमिकनगर वाळवा) याच्यावर पूर्ववैमनस्यातून चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवार, दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
वाळवा येथील किरण कावडे व शुभम कांबळे यांच्यात सुमारे महिन्यापूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता. तेव्हापासून तो चिडून होता. सोमवारी सायंकाळी ६च्या दरम्यान किरण कावडे याने श्रमिकनगर कमानीजवळ असलेल्या हरिभाऊ मिस्त्री यांच्याकडे मोटरसायकल दुरुस्तीसाठी दिली होती. ती दुरुस्त झाली का पाहण्यासाठी किरण गेला होता. दुकान बंद असल्याने किरण चालत घरी जात असताना शुभम कांबळे कमानीजवळ उभा होता. किरणला पाहताच 'किरण्या थांब तुला जिवंत ठेवत नाही ' असे म्हणून खिशातील चाकू काढून शुभम किरणच्या दिशेने धावत आला. किरण पळत असताना त्याच्या पाठीमागून शुभम कांबळेने कमरेजवळ डाव्या बाजूस चाकूचा वार केला. त्या ठिकाणी असलेल्या योगेश पवार, पृथ्वीराज कांबळे यांनी किरणला तातडीने वाळवा ग्रामीण रुग्णालय व आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास हवालदार योगेश जाधव करत आहेत.