कोकरुड : चांदोली (ता. शिराळा) येथे धरण पाहण्यासाठी गेलेल्या एका सैनिकाने तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिसासह दोन होमगार्डना शिवीगाळ करत खुर्चीने मारहाण केल्याची तक्रार पोलीस शिपाई सूर्यकांत शिवाजी निकम यांनी मंगळवारी रात्री उशिरा कोकरुड पोलिसात दिली. याप्रकरणी संशयित आरोपी गणेश जगन्नाथ कोळपाटे (रा. कोकरुड, ता. शिराळा) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
कोकरुड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सूर्यकांत निकम हे होमगार्ड संपत ज्ञानू शेवडे व आमदार धोंडीराम कांबळे यांच्यासोबत चांदोली धरणाजवळील गेट क्रमांक १ वर बंदोबस्तासाठी होते. मंगळवारी दुपारी चारच्यासुमारास आरळ्याहून सैनिक गणेश जगन्नाथ कोळपाटे हा आपल्या तीन मित्रांसह मोटारीने (क्र. एमएच १२. जी व्ही ०२५७) आला. यावेळी तो फ्री पास न दाखवता गेट उघडून जात असताना पोलीस शिपाई सूर्यकांत निकम यांनी त्यास पास आहे का, असे विचारले. तेव्हा कोळपाटे याने माझ्याकडे पास नाही, मी कोण आहे, तुला माहिती आहे का. असे म्हणत तो धरणाकडे निघाला. त्यावेळी निकम यांनी त्याला नाव विचारले. याचा राग आल्याने कोळपाटे याने निकम यांना शिवीगाळ करत कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच जवळ असलेली खुर्चीही डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला असता, ती हातावर लागली. तसेच तेथे उपस्थित असलेल्या दोन्ही होमगार्डनाही शिवीगाळ केली. त्यानंतर जलसंपदा विभागाचे वसंत पाटील व कोळपाटेबरोबर आलेल्या त्याच्या मित्रांनी त्यास बाजूला नेले. याबाबत सूर्यकांत निकम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर कोळपाटेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.