कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) पोलीस ठाण्याच्यावतीने कोकरुड येथील वारणा नदीवर आणि मेणी फाटा येथे जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करून विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी दिली.
जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून जिल्हाबंदी जाहीर झाली आहे. त्यानुसार कोकरुड पोलीस ठाण्याच्याअंतर्गत कोकरुड येथील वारणा नदीच्या पुलावर व मेणीफाटा येथे जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना परवानगीशिवाय सोडले जाणार नसून जे कायद्याचे पालन करणार नाहीत, अशा नागरिकांवर कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
जिल्हाअंतर्गत विनामास्क आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील. गुरुवारी अत्यावश्यक सेवा वगळून दुकान सुरू ठेवल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर विनामास्क फिरणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करून तीन हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.