दत्ता पाटील तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याठिकाणी अडथळा ठरणाऱ्या खोक्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती, मात्र पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या विषयाला सोयीस्कर बगल देण्यात आली असून, ३ जुलैला होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावरून हा विषय वगळल्याने राष्ट्रवादीच्या मागणीला कोलदांडा दाखवल्याचे दिसून येत आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, राज्याला धोरणात्मक निर्णयातून दिशा देणाऱ्या आबांचे स्मारक तासगावात असावे, अशी मागणी होत होती. त्यानंतर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समितीच्या आवारात आबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला.
बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस स्मारक उभारण्यात येत आहे. मात्र या स्मारकापुढे पालिकेच्या जागेवरील खोक्यांचा अडथळा ठरत आहे. या ठिकाणाहून खोकी काढून, अन्यत्र खोक्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी बाजार समितीकडून निवेदनाद्वारे करण्यात आली होती.राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद बाळासाहेब सावंत आणि नगरसेविका प्रतिभाताई लुगडे यांनीही खोक्यांचे पुनर्वसन करण्याबाबत लेखी मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेतही, आबांच्या स्मारकास अडथळा ठरणाऱ्या खोक्यांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती.
त्यावेळी नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी त्या सभेत फक्त विषयपत्रिकेवरील विषयांवरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगत खोक्यांबाबतीत माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यावेळी नगरसेवक बाळासाहेब सावंत यांनी यापूर्वीच लेखी निवेदन दिले असून, पुनर्वसनाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. मात्र भाजपकडून ही सभाच गुंडाळण्यात आली.नगराध्यक्षांनी गतवेळच्या सभेत विषयपत्रिकेवरील विषयांनाच मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. बाजार समिती आणि राष्ट्रवादीकडून नगरपालिकेकडे खोकी पुनर्वसनाबाबत लेखी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीसह आबाप्रेमींसाठी स्मारकाचा विषय जिव्हाळ्याचा ठरणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या सभेत हा विषय अजेंड्यावर येईल, अशी अपेक्षा होती.नगराध्यक्ष डॉ. सावंत यांनी ३ जुलैरोजी होणाऱ्या सभेचा अजेंडा प्रसिध्द केला आहे. या अजेंड्यातून खोकी पुनर्वसनाचा विषय सोयीस्करपणे वगळण्यात आला आहे. विषयपत्रिकेवर विषय नसल्याने, खोकी पुनर्वसनाच्या विषयावरचा निर्णय लटकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने या निर्णयातून राजकीय कुरघोडी करण्यासाठी हा विषय वगळला असल्याची चर्चा होत आहे. या निर्णयाने आबाप्रेमींतून नाराजी व्यक्त होत असून, राष्ट्रवादीकडून मात्र या निर्णयाविरोधात आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आबांच्या स्मारकाच्यानिमित्ताने भाजप विरुध्द राष्ट्रवादी पुन्हा एकदा उभे ठाकणार का? याची उत्सुकता आहे.