सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कवठेमहांकाळ येथील उपसमितीचे सभापती दादासाहेब ऊर्फ पिंटू कोळेकर यांचे पद पणन सहसंचालक यशवंत गिरी यांनी मंगळवारी रद्द केले. या निर्णयामुळे खासदार संजयकाका पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे.महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम तीस, तसेच मंजूर उपविधी ४५ (१) नुसार केलेल्या उपसमित्या या कायद्यानुसार गठित करण्यात आलेल्या नाहीत. मूळ बारा उपसमित्या अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मंजूर आहेत. बारा उपसमित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांना घेता येते, परंतु त्यांना संचालकांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची मान्यता आवश्यक आहे. तसा ठराव समितीमध्ये केला पाहिजे. स्वीकृत संचालक नेमणुकीसंदर्भात कायदा कलम तीसचे पालन करणे बंधनकारक आहे. शासननियुक्त संचालकास उपसमितीचा प्रमुख अथवा सदस्य म्हणून नेमल्यास नियमाचा भंग होतो. बाजार समितीच्या १७ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या सभेत उपसमित्यांमध्ये शासनाने नियुक्त केलेले स्वीकृत संचालक कोळेकर यांची कवठेमहांकाळ बाजार दुय्यम आवारच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. शासननियुक्त सदस्यांस मत मांडता येते, सूचक किंंवा अनुमोदक होता येत नाही. शासनाच्या अधिनियमानुसार व बाजार समितीच्या मंजूर उपविधीप्रमाणे बाजार समितीस बारा उपसमित्यांची मंजुरी आहे. त्यामधील उपसमितीचे प्रमुख म्हणून कोळेकर यांची बेकायदेशीर निवड करण्यात आली असून ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी माजी सभापती भारत डुबुले यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी पणन संचालकांकडे त्याबाबत मार्गदर्शन मागविले होते. शासननियुक्त केलेल्या सदस्यांना सभेत भाग घेता येतो, मात्र मतदान करण्याचा अधिकार नाही. कवठेमहांकाळ आवारचे सभापती कोळेकर यांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांची निवड अवैध असल्याचे यशवंत गिरी यांनी लेखी आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
कोळेकरांचे सभापतीपद रद्द
By admin | Published: April 12, 2017 12:39 AM