कोल्हापूर : शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दि. १ तारखेस पगार व्हावा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी; अन्यथा दि. २ जानेवारीला साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा हशमत हावेरी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.अध्यक्षा हावेरी म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) सातशे नर्सिंग संवर्गातील कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ५५० कर्मचारी कार्यरत आहे.
रिक्त जागांमुळे कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच दर महिन्याचा पगार एक तारखेऐवजी उशिरा मिळत आहे. त्याचा दंडाचा भुर्दंड हा बँक, पतसंस्थांच्या कर्जांचे हप्ते फेडताना कर्मचाऱ्यांना बसत आहे. ‘सीपीआर’मधील सर्व प्रमुख पदे प्रभारी अथवा अनुभव पात्रता कमी किंवा तात्पुरती अनियमित आहेत.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ आणि रुग्णांना आवश्यक अशा सुविधा वैद्यकीय निर्देशांप्रमाणे मिळत नाही. त्याचा प्रत्यक्ष परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. ते टाळण्यासह कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये यासाठी दर महिन्याच्या एक तारखेस पगार व्हावा. नववर्षापासून त्याची अंमलबजावणी न झाल्यास दि. २ जानेवारीपासून सीपीआर रुग्णालयात साखळी उपोषण करण्यात येईल. यानंतर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास टप्प्याटप्याने आंदोलन तीव्र केले जाईल.या पत्रकार परिषदेस असोसिएशनचे सरचिटणीस संदीप नलवडे, वरिष्ठ कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मुठे, संघटक सचिव श्रीमंती पाटील, राजश्री शेळके, पुष्पा गायकवाड, अविनाश कांबळे उपस्थित होते.आदेश, निर्णयानुसार कार्यवाही नाहीदि. १ तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय आहे. वैद्यकीय विभागाचे सचिव, संचालक आणि अधिष्ठाता यांचेदेखील तसे लेखी आदेश आहेत. यानुसार कार्यवाही होत नाही. निव्वळ आस्थापनेतील भोंगळ कारभारामुळे पगार होण्यास विलंब होत असल्याचे जिल्हा सरचिटणीस संदीप नलवडे यांनी सांगितले.
मागण्या अशा
- ‘सीपीआर’मधील प्रभारी नियमितपणे भरावीत.
- रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत.
- सर्व आर्थिक लाभ वेळेत मिळावेत.