सांगली : सोलापूर-कोल्हापूर व सोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत.सोलापूर विभागाच्या सोलापूर-कोल्हापूर व कोल्हापूर-सोलापूर या एक्सप्रेस दररोज रात्री ११ वाजता सोलापूर व कोल्हापुरातून सुटतात. तर सोलापूर -मिरज एक्सप्रेस सकाळी सात वाजता सोलापुरातून आणि संध्याकाळी साडेचार वाजता मिरजेतून सुटते. लॉकडाऊन काळात त्या थांबविण्यात आल्या होत्या. अनलॉक काळात काही आरक्षित प्रवासाच्या गाड्या पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागात सुरु आहेत.
या गाड्यांमध्ये जनरल श्रेणीचा प्रवास करता येणार नाही, फक्त आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवेश मिळेल. सोलापूरचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी याला दुजोरा दिला. १ सप्टेंबरपासून काही आरक्षित गाड्या सुरु केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.
प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. कोरोनाविषयक खबरदारी घेऊन प्रवासाला मुभा मिळेल. दीड वर्षांपासून गाड्या बंद असल्याने प्रवाशांची कुचंबणा झाली आहे.पंढरपूर पॅसेंजर तूर्त नाहीचदरम्यान, मिरज ते पंढरपूर मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरु होण्याची चिन्हे मात्र नाहीत. संपूर्ण अनलॉकनंतरच टप्प्याटप्प्याने त्या सुरु होतील.