मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गाची पाहणी दौऱ्यात मिरज स्थानकास भेट दिली. यावेळी त्यांनी दुहेरीकरण, इंटरलॉकिंग, रेल्वेस्थानक, प्रवासी सुविधा, कर्मचारी वसाहतीची पाहणी केली. कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पुणे विभागाच्या प्रबंधक इंदूराणी दुबे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पुणे-कोल्हापूर रेल्वेमार्गावर सुरू असणाऱ्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापक रामकरण यादव हे सोमवारी मिरज, कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. लोणंद रेल्वेस्थानकापासून या पाहणीला सुरुवात करण्यात आली. महाव्यवस्थापक यादव यांनी विविध रेल्वेस्थानकांवर नव्याने करण्यात येत असलेली कामे प्रवासी सुविधांची, पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्याने उभारण्यात येत असलेले फलाट, रेल्वे सुरक्षा कक्ष, मालधक्का, रेल्वे क्रॉसिंग गेट, रेल्वे पूल इत्यादींची पाहणी केली.
मिरज रेल्वेस्थानकाजवळ सुरू असणाऱ्या इंटरलॉकिंग दुहेरीकरण, विद्युतीकरणाची व मालधक्क्याची त्यांनी पाहणी केली. पुणे ते कोल्हापूर दरम्यान विशेष रेल्वेतून महाव्यवस्थापक यादव यांनी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाची पाहणी केली. मिरज स्थानकात रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील, गजेंद्र कडोळी, ज्ञानेश्वर पोतदार, सचिन कुकरेजा यांनी यादव यांना कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेससह कोल्हापूर वडोदरा व कोल्हापूर हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. महाव्यवस्थापक यादव यांनी कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.