ही एक्स्प्रेस कोल्हापुरातून दर सोमवारी, शुक्रवारी दुपारी १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता नागपूरला पोहोचेल, तर मंगळवार व शनिवारी नागपूरहून दुपारी ३.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता कोल्हापूरला पोहोचेल. ही एक्स्प्रेस मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पूलगाव, वर्धा व अजनी स्थानकात थांबणार आहे. या एक्स्प्रेसमधून आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी २२ मार्चपासून कोल्हापूर - नागपूर द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे बंद होती. अनलाॅक काळात पुणे व बेळगाव मार्गावरील एक्स्प्रेस सुरू झाल्या. मात्र, मिरज -पंढरपूर मार्गावरील रेल्वे गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. पंढरपूरमार्गे नागपूर एक्स्प्रेस सुरू झाल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. कोल्हापूर - नागपूरसोबत पुणे - सोलापूर एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस सुरू होणार आहे. मात्र, कोल्हापूर - सोलापूर एक्स्प्रेस सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.