शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: गणेशोत्सव व ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शिवाय मिरवणुकीवर ड्रोनचीही नजर असेल. ध्वनीप्रदुषणाबाबत पोलिस प्रशासन गंभीर असून मर्यादा ओलांडणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
फुलारी म्हणाले की, गणेशोत्सव व ईद सणात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दोन महिन्यापासून तयारी सुरू केली होती. पाच जिल्ह्यातील पोलिस प्रमुखांच्या बैठका घेऊन सूचना केल्या. ध्वनीप्रदुषण व नियमांचे पालन न करणारी मंडळांची कुंडली काढली. दंगल नियंत्रण पथक, राखीव दल तैनात केले. महसूल, महापालिका, जिल्हा परिषद, महावितरणसह शासकीय विभागाशी समन्वय ठेवला. परिणामकारक अशा प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. जिल्ह्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले.
सांगली, मिरजेतील मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही, बॅरिकेटस लावले आहेत. गणेश मंडळावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल. प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून ध्वनीप्रदुषणाचे मानके घेतली आहे. पोलिसांकडून ध्वनीप्रदुषण करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जातील. तत्पूर्वी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून सूचना केली जाणार आहे. पहिल्यादिवशी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल मिरजेतील एका मंडळाला नोटीस दिली असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.
ओरिसातील ती घटना टाळण्याचा प्रयत्न
ओरिसा येथे मिरवणुकीवेळी विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने पाच विद्यार्थ्यांचा बळी गेला. सांगली-मिरजेत अनेक मिरवणुक मार्गावर विद्युत तारा खाली आल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाशी पोलिस प्रशासन संपर्क करणार आहे. ओरिसासारखी घटना टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही फुलारी यांनी केले.