युनूस शेख
इस्लामपूर - येथील खासदार एस.डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने घेण्यात आलेल्या ३६ व्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोल्हापूर पोलिसांनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले.पोलीस संघाने मराठा आर्मीच्या कोल्हापूर तळाचा १-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्याहस्ते विजेत्या संघाला ३६ हजार रुपये रोख आणि एस.डी. पाटील सुवर्णचषक देऊन गौरविण्यात आले.यावेळी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सचिव ऍड.बी.एस.पाटील, सहसचिव ऍड.धैर्यशील पाटील,ट्रस्टचे मार्गदर्शक संजय पाटील,अरुणादेवी पाटील,ऍड.चिमण डांगे, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विजय जाधव,प्रताप पाटील प्रशांत जाधव उपस्थित होते.उपविजेत्या संघाला २५ हजार रुपये आणि रौप्यचषक देण्यात आला.मराठा संघाचा गोलरक्षक रोशन पाटील हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विद्यामंदिर हायस्कुलच्या मैदानावर गेल्या चार दिवसांपासून या नामांकित स्पर्धा सुरू होत्या.सकाळी दोन उपांत्य सामने झाले.त्यातून कोल्हापूर पोलीस आणि मराठा आर्मीच्या संघाने अंतीम फेरीत धडक मारली.सायंकाळी या दोन्ही संघांदरम्यान विजेतेपदासाठीची अंतीम लढत झाली.दोन्ही संघ व्यावसायिक पद्धतीने खेळणारे असल्याने क्रीडारसिकांना दर्जेदार खेळाचा आनंद लुटता आला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने जिंकण्यासाठीचा त्वेष आणि इर्षेने खेळ झाला.दोन्ही सत्रामध्ये हा सामना चुरशीने खेळला गेला. एकमेकांच्या गोलक्षेत्रात धडक मारताना दोन्ही बाजूच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी अनेकदा धोकादायक चाली रचत वेगवान खेळाचे दर्शन घडवले.
कोल्हापूरकडून पृथ्वीराज साळुंखे,आयुब पेंढारी,विनोद मनुगडे श्रीधर जाधव यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलं तर मराठा संघाचा तालीब शहा,संकेत पाटील विजय पाटील,अक्षय खोत,सौरभ सातपुते पृथ्वीराज पाटील यांनी अप्रतिम खेळ केला.कोल्हापूरच्या श्रीधर जाधव याने एकमेव विजयी गोल नोंदवला.मराठा आर्मीच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले,मात्र मोक्याच्या क्षणी त्यांना गोल करण्यात अपयश येत होते.शेवटी कोल्हापूर पोलीस संघाने हा अंतीम सामना १-० अशा फरकाने जिंकत सुवर्णचषकावर आपले नाव कोरले. ट्रस्टचे राष्ट्रीय हॉकी खेळाडू संजय चरापले,संजय चव्हाण,संजय कबुरे,राजेंद्र खंकाळे,सदाशिव जाधव यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले.