हरिपूर, सांगली , दि. २६ : अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यस्तरीय शालेय सतरा वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींत लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हे सामने पार पडले.
मुलांच्या अंतिम सामन्यात अनुभवी कोल्हापूर विभागाने नाशिकचा, तर मुलींच्या अंतिम सामन्यात लातूर विभागाने कोल्हापूर विभागाचा धुव्वा उडवत विजेतेपद आपल्या नावे केले. दरवर्षी अग्रेसर असलेल्या मुंबई व पुणे विभागाला मात्र यंदाच्यावर्षी तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र क्रेडाईचे सहसचिव दीपक सूर्यवंशी, जितेंद्र सोनवणे व देवीदास राजपूत (मुंबई) यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर जमादार यांनी आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र इखणकर, सहसचिव प्रदीप खिलारे, खजिनदार अशोक सरोदे, समन्वयक ज्ञानेश काळे, शंकर भास्करे, उदय गायकवाड आदी उपस्थित होते. सांगलीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या संघाची दुर्ग (छत्तीसगड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अंतिम निकाल...
मुले : कोल्हापूर (प्रथम), नाशिक (द्वितीय), मुंबई (तृतीय), पुणे (चतुर्थ).मुली : लातूर (प्रथम), कोल्हापूर (द्वितीय), पुणे (तृतीय), नाशिक (चतुर्थ).