सांगली : खासगी भिशीमध्ये चांगला परतावा देतो, असे सांगून कसबा बावडा (कोल्हापूर) येथील तिघांची १२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी भिशी चालक मिलिंद संभाजी चव्हाण (रा. नरवीर तानाजी मंडळाजवळ, खणभाग, सांगली) या नातेवाइकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अमित बाळासाहेब ठाणेकर (वय ४५, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, फिर्यादी अमित ठाणेकर यांचा संशयित मिलिंद चव्हाण हा नातेवाईक आहे. चव्हाण याने ठाणेकर यांना खासगी भिशीतून चांगला परतावा मिळू शकतो, असे आमिष दाखवले. ठाणेकर यांनी चव्हाण हा नातेवाईक असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर २०१८ पासून चव्हाण याच्या ‘शिवशंकर भिशी मंडळ हरिपूर’ या खासगी भिशीमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. ठाणेकर तसेच त्यांची पत्नी अंजली ठाणेकर, भाऊ रणजीत ठाणेकर यांनीही भिशीमध्ये पैसे गुंतवले. तिघांनी मिळून १२ लाख १० हजार रुपये गुंतवले.
भिशीची मुदत संपल्यानंतर ठाणेकर यांनी पैसे परत मिळण्यासाठी विचारणा केली. तेव्हा चव्हाण याने टोलवाटोलव केली. आज-उद्या देतो असे सांगत पैसे देण्यास टाळले. ठाणेकर यांनीही चव्हाण हा नातेवाईक असल्यामुळे सामोपचाराने वारंवार विचारणा केली. परंतु चव्हाण याने आजतागायत टाळाटाळ केली. त्यामुळे ठाणेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत चव्हाण याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार चव्हाण याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.