संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: ‘वोकल फॉर लोकल' मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवर स्थानिक उत्पादनांसाठी विक्रीकेंद्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. कोल्हापूर स्थानकात कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असून मिरजेत प्रवाशांना तंतुवाद्ये खरेदी करता येणार आहेत. साताऱ्यात कंदी पेढे विकले जात आहेत. हातकणंगले स्थानकात बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती उपलब्ध झाल्या आहेत.
स्थानिक तथा स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने विविध स्थानकांंमध्ये 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' (ओएसओपी) योजना सुरू केली आहे. स्थानिक उत्पादकांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करुन दिले आहेत. २५ मार्च २०२२ ते १५ मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ६९ स्थानकांवर ७२ विक्री केंद्रे सुरु झाली आहेत. या सर्व केंद्रांची रचना एकसारखी आहे.स्थानिक आदिवासींनी बनवलेल्या कलाकृती, विणकरांची हातमाग वस्त्रे, लाकडावरील कोरीवकाम, चिकनकारी, जरीकाम, जर्दोशी यासारखी कलाकुसर, मसाले, चहा, कॉफी यासह विविध खाद्यपदार्थ या केंद्रात मिळतात. महाराष्ट्रातील स्थानकांत केळी, द्राक्षे, पापड, अहमदनगर येथे लोणचे, बडनेरा येथे सांबरवाडी, मुंबईत येथे चामड्याची उत्पादने, अगरबत्ती, धूप, साबण, चिंचवड येथे फिनाइल, चर्चगेट येथे चामड्याची उत्पादने यांची विक्री सुरु आहे. गोरेगावमध्ये खादी उत्पादने, इगतपुरीत पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणची, पापड इत्यादी हंगामी फळे व खाद्यपदार्थ, कोल्हापूरात कोल्हापुरी चप्पल, कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी, लोणावळा येथे चिक्की, नाशिकरोड येथे पैठणी साड्या , पंढरपूर येथे विठ्ठल मूर्ती, कुंकू, अगरबत्ती आणि इतर पूजा साहित्य, नागपूर येथे बांबू उत्पादने, परळ येथे कापड आणि हातमागावरील उत्पादने, पिंपरी येथे कागदी व कापडी पिशव्या, सातारा येथे कंदी पेढा, शेगावमध्ये पापड, सोलापुरात सोलापुरी बेडशीट्स आणि टॉवेल, वापी आणि बोरिवली येथे वारली कला आणि हस्तकला, वसई रोड आणि नालासोपारा येथे खेळणी विकण्याची सुविधा देण्यात आली आहे.