सांगली : शहरातील प्रभाग १८ मधील विठ्ठलनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात ३५ खाटांचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. नगरसेवक अभिजित भोसले यांच्या प्रयत्नातून व लोकसहभागातून साकारत असलेल्या या केअर सेंटरमध्ये १५ ऑक्सिजन खाटांची सुविधा असणार आहे. औषधे, उपचारासह जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते दोन दिवसात या सेंटरचे लोकार्पण होणार आहे.यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, युवा नेते विशाल पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगरसेवक भोसले यांनी दिली.
शहरात उपचाराअभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी नगरसेवक भोसले यांनी पुढाकार घेत हनुमाननगर येथे कोवीड केअर सेंटर उभा करण्याचा निर्णय घेतला. त्याला लोकांचाही प्रतिसाद मिळाला. अनेकांनी मदतीचा हात दिला. यातून ३५ खाटांचे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. यामध्ये ऑक्सिजनयुक्त १५ खाटांची सोय करण्यात आली आहे.नगरसेवक भोसले म्हणाले, यासाठी अनेकांनी हातभार लावला आहे. रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय दोन वेळचे जेवण, चहा, नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. केअर सेंटरसाठी आवश्यक डॉक्टर्स, परिचारिका घेण्यात आले आहेत. शहरातील काही नामांकित डॉक्टरांनीही या सेंटरमध्ये सेवा देण्याचे मान्य केले आहे.
राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते दोन दिवसात या केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कोरोना केअर सेंटरमुळे शामरावनगर, हनुमाननगर, विठ्ठलनगरसह परिसरातील रुग्णांना फायदा होणार आहे. प्रभागाच्या बाहेरील रुग्णांवरही या केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.