आष्टा पालिकेतील बैठकीत बोलताना वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, डॉ. कैलास चव्हाण, स्नेहा माळी.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील काशिलिंग बिरोबा मंदिराच्या पाठीमागील बाजूला भक्तनिवासमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी दिली.
पालिकेच्या काकासाहेब शिंदे सभागृहात शहरातील प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यात तातडीची बैठक आयोजित करून शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, आर. एन. कांबळे उपस्थित होते.
आष्टा शहरातील बिरोबा मंदिराच्या भक्त निवासमध्ये एकूण १२ खोल्यांत ३६ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. वैभव शिंदे म्हणाले, शहरातील जनतेची आष्टा पालिकेतर्फे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत कित्येक दिवसांची मागणी होती. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग तसेच आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यात बैठक होऊन कोविड सेंटर सुरू करण्याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी लागणारे ५०० कीट आष्टा पालिकेने ग्रामीण रुग्णालयास द्यावेत तसेच ज्या ज्या घरात कोविडचे पेशंट आहेत, त्या कुटुंबीयांनी आपली टेस्ट करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी. डॉ. कैलास चव्हाण म्हणाले, सर्वांनी कोरोनासंदर्भात नियम पाळून काळजी घ्यावी तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.