सांगली : कोयना धरणात १०१.५७ टीएमसी पाण्याचा साठा झाल्यामुळे आज, मंगळवारी दुपारी २ वाजल्यानंतर धरणाचे सहा वक्रदरवाजे एक फूट सहा इंचाने उघडून १३९४१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तसेच चांदोली (वारणा) धरणामध्ये ३४.०७ टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणातून २५०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांतही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरण प्रशासनाने मंगळवार, दि. १३ रोजी दुपारी २ वाजता कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे एक फूट सहा इंचाने उघडून १२ हजार ८९१ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून १०५० क्युसेक विसर्ग चालू असल्याने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण १३ हजार ९४१ क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे.वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. धरणामध्ये ३४.०७ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने मंगळवारी दुपारी १२.३० वाजल्यापासून २५०० क्युसेकने विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे.
जिल्ह्यातील पाऊसगेल्या चोवीस तासांतील पाऊस आणि कंसात १ जूनपासूनचा एकूण पाऊस असा आहे. मिरज २.९ (४१४), जत ०.५ (४४८.८), खानापूर ५.६ (५४४.३), वाळवा ११.९ (५९६.४), तासगाव ४.९ (४७६.३), शिराळा २२.८ (११५८.९), आटपाडी ५ (३६०.४), कवठेमहांकाळ १.६ (५३८.२), पलूस ५.४ (४१८.४), कडेगाव ६.२ (५१३.८).