विटा : राज्य शासनाकडून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी आलेली लाखो रुपयांची कृषी औषधे तालुका कृषी विभागाकडून विट्यात जाळून टाकून नष्ट करण्यात आली. ही औषधे मुदतबाह्य असल्याने नष्ट करण्यात आल्याचा खुलासा तालुका कृषी कार्यालयातून सोमवारी करण्यात आला असला तरी, ती मुदतबाह्य कशी झाली? मुदतबाह्य होण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांना या औषधांचे वाटप का झाले नाही? या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. या प्रकाराने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.खानापूर तालुका कृषी विभागाचे गोदाम विटा ते कुंडल रस्त्यालगत जुन्या कार्यालयाजवळ आहे. गोदामात शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत देण्यासाठी कीटकनाशक, तृणनाशक आणि विविध बियाणांचा साठा करण्यात आला आहे. काही वर्षांपासून कृषी औषधांचा साठा पडून होता. दोन दिवसांपूर्वी या औषधांच्या अनेक बाटल्या फुटल्याने व काही बाटल्यांना गळती लागल्याने कर्मचाऱ्यांनी ती गोदामाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ओघळीत टाकून दिली.मात्र, नागरिकांचे लक्ष गेल्यानंतर या प्लॅस्टिक बाटल्या कर्मचाऱ्यांनी थेट जाळून टाकल्या. शनिवारी आत्मा संस्थेच्यावतीने गोदामाजवळ शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.शासन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनेतून कीटकनाशक, तृणनाशक, बियाणे यासह विविध कृषी अवजारांचे वाटप करीत असताना, कृषी विभागाकडून या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. मुदतबाह्य झाल्याने व दुर्गंधी येत असल्याने ही औषधे नष्ट केल्याचे तालुका कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. मुदतबाह्य होईपर्यंत ही औषधे गोदामात साठवून का ठेवण्यात आली? लाभार्थी शेतकऱ्यांना त्याचे वाटप का झाले नाही? शासनाचे लाखो रुपये पाण्यात घालण्यास जबाबदार कोण? यासह विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)औषधे मुदतबाह्य : कारवाईची मागणीशासनाकडून साहित्य मिळत नसल्याचे सांगून दुष्काळी शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांची औषधे मुदतबाह्य झाली. औषधे जाळून नष्ट करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करावी व दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी शिंदे यांनी दिला.दुर्गंधी येऊ लागल्याने औषधे नष्टतालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल याबाबत म्हणाले की, ही औषधे मुदतबाह्य झाली होती. गेल्या पाच ते सात वर्षांपासून औषधे गोदामात पडून होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याने ती नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोदामात अजूनही कृषी विभागाकडील दुर्गंधीयुक्त व मुदतबाह्य औषधांचा साठा आहे. परंतु, सध्या ती नष्ट करण्याचे काम थांबविण्यात आले आहे.
विट्यात ‘कृषी’ची औषधे नष्ट
By admin | Published: January 02, 2017 11:29 PM